Mamta Kulkarni : ‘अचानक भारतात येते, महाकुंभात सहभागी होते आणि महामंडलेश्वर पद देतात…”; ‘या’ व्यक्तीने केली ममताच्या चौकशीची मागणी

Mamta Kulkarni – करण अर्जुन या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली पूर्वाश्रमीची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. ही वादग्रस्त अभिनेत्री महामंडलेश्वर झाल्याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्रान्सजेंडर कथावाचक जगतगुरु हिमांगी सखी यांनी ममताच्या महामंडलेश्वर होण्यावर आक्षेप घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्य असलेली ममता कुलकर्णी २५ वर्षांनी भारतात परतली आहे आणि तीही संन्यासी होण्यासाठी. कुंभनगरीमध्ये संन्यास घेतल्यानंतर, ममताला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले. तथापि, वादग्रस्त अभिनेत्री महामंडलेश्वर बनल्याने अनेक लोक संतापले आहेत.
माध्यमांशी बोलताना हिमांगी सखी म्हणाल्या, ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याने प्रसिद्धीसाठी महामंडलेश्वर बनवले आहे. समाजाला तिचा भूतकाळ चांगलाच माहिती आहे. तिला यापूर्वीही ड्रग्जच्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला आहे. अचानक ती भारतात येते, ती महाकुंभात सहभागी होते आणि तिला महामंडलेश्वर हे पद देण्यात आले आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
हिमांशी सखी यांनी ममता कुलकर्णी यांना गुरुपदासाठी अयोग्य घोषित केले आहे. अशा व्यक्तीला महामंडलेश्वर ही पदवी देऊन तुम्ही सनातन धर्माला कोणत्या प्रकारचे गुरु देत आहात? हा नैतिकतेचा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीला गुरु म्हणवून घेण्यास पात्र नाही तिला गुरु बनवले जात आहे.
दरम्यान, २०१४ मध्ये ममताचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. यामुळे तिला ताब्यातही घेण्यात आले होते, परंतु नंतर तिला या प्रकरणातून मुक्त करण्यात आले.





