Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात केज न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. यावेळी केज न्यायालयाने सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. केज येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
मात्र सुदर्शन घुलेला सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता खंडणी प्रकरणात देखील सीआयडी कडून सुदर्शन घुलेची चौकशी केली जात आहे. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांची चौकशी झाली आहे. मात्र, सुदर्शन घुले याची चौकशी अद्याप बाकी आहे.
सुदर्शन खुले याला आज सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर यांनी केज न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. यावेळी सीआयडीने सुदर्शन घुलेला 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. परंतु, न्यायमूर्ती एस. व्ही. पावसकर यांनी सुदर्शन घुलेला 14 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोन दिवसांत सीआयडीकडून सुदर्शन घुले याची पुन्हा कसून चौकशी केली जाईल. पोलिसांकडून सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत.





