“कॉंग्रेस पक्ष बिथरल्यामुळे अशी वक्तव्ये..”

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष बिथरला असल्यामुळे अशी निराधार वक्तव्ये करत आहे. या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विधाने अत्यंत निंदनीय आहेत. उत्तरेपासूद दक्षिणेपर्यंत लोक निवडणुकांमध्ये घराणेशाहीला नाकारत आहेत. भारतात आता वास्तविक पध्दतीने लोकशाहीचा प्रभाव वाढला आहे अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्षाचा प्रत्येक आरोप आणि टीका खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले कॉंग्रेसचे पहिले पंतप्रधान शून्य मत मिळवून पंतप्रधान झाले होते. सगळी मते सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळाली होती. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग यांनीही प्रणव मुखर्जी यांना सांगितले होते की मॅडमने त्यांना पंतप्रधान होण्यास सांगितले आहे. आतापर्यंत आपल्या देशात पतंप्रधान म्हणून केवळ दोनच पंतप्रधान निवडून आले आहेत. एक अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे नरेंद्र मोदी. त्याखेरिज अन्य कोणी जनतेकडून निवडून आल्यासारखे दिसत नाही.
ते पुढे म्हणाले की लोकशाहीचा हवाला देणारा कॉंग्रेस नेते कदाचित हे विसरले आहेत की राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या विरोधात एका वर्तमान पत्राने काहीतरी लिहिले होते तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचे वीज कनेक्शनही तोडण्यात आले होते. टेलीग्रॉफ कायदा कोणी आणला? राजीव गांधी यांच्या काळातच हा कायदा आणला गेला. या कायद्यानुसारच सरकार सामान्य माणसाची पत्रेही वाचू शकत होते आणि कारवाई करू शकत होते. पी. व्ही. नरसिंह राव यांनी पैसे देऊन सरकार स्थापन केले आणि ते न्यायालयात सिध्दही झाले. इंदिरा गांधी यांनी तर लोकसभेचा कार्यकाळ वाढवला होता.
मीसा कायदा कोणी आणला होता असे विचारतानाच आणीबाणीच्या काळात अंतर्गत सुरक्षा कायद्यात अनेक दुरूस्ती केल्या गेल्या आणि इंदिरा गांधी यांच्या निरंकुश सरकारने केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांना चिरडण्याचेच काम केले. लालू यांनी तेंव्हाच आपल्या मुलीची नाव मीसा ठेवले होते आणि कॉंग्रेसला आपण उखडून टाकू असे जाहीर केले होते. कॉंग्रेसचे नेते देवकांत बरुआ म्हणाले होते की इंदिरा इज इंडिया ॲंड इंडिया इज इंदिरा. आणि या घोषणेबद्दल कॉंग्रेसने आजपर्यंत माफी मागितली नाही.





