Indrayani River : …असा घडला अपघात.! “पाटीकडे पाठ, पर्यटनाची लागली वाट”

Indrayani River – कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) दुपारच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात काही पर्यटकांचा जीव गेला, तर काहीजण गंभीर, किरकोळ जखमी झाले. अजुनही याठिकाणी बचावकार्य पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे मृतांचा, जखमींचा अंतिम आकडा समोर आलेला नाही. परंतु झालेला अपघात नक्कीच दुर्दैवी असून याचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूल कोसळून हा अपघात घडला हे सत्य असले, तरीही तरीही पूल नक्की का आणि कसा कोसळला ह्याची माहिती आता समोर आली आहे.
उपस्थित पर्यटक आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पूल कोसळला तेव्हा पुलावर भरपूर गर्दी होती. सोबत काही दुचाकी देखील पुलावर होत्या. अतिवजनाने हा पूल कोसळला व दुर्घटना घडली. एका पर्यटकाने सांगितले की, गर्दी खूप होती, लोकांना पुढे सरका असे काही लोक सांगत होते, परंतु कुणी एकले नाही.
या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे पूल धोकादायक असताना त्याठिकाणी इतके पर्यटक आणि वाहने गेली कशी? दरम्यान याही प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला सूचना फलक देखील लावले होते. तरीही पर्यटकांनी सूचनांचे पालन केले नाही आणि पुलावर गर्दी केली.
प्रचंड गर्दी, पूल हलू लागला आणि अखेर कोसळला…
या अपघातातून वाचलेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानुसार पुलावर पन्नास ते साठ लोकं होती. साधारण तीन ते चार मिनिटे पूल हलत होता, तरीही सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जेव्हा दोन्ही बाजुला दुचाकी आल्या तेव्हा पूल वाकला आणि नदीत कोसळला.
बंदी असताना गर्दी झाली कशी?
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी प्रशासनाकडून पर्यटनासाठी यापूर्वीच आवाहन करून बंदी घालण्यात आली होती. तरीही पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली. रविवारी गर्दी होते हे माहीत असतानाही पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कोणतीही कार्यवाही का केली नाही?
खूपच अरुंद असल्याने या पुलावर चारचाकी जाऊच शकत नाही, दुचाकीसाठी देखील बंदी घातली होती. तरीही दुचाकी पुलावर कशा गेल्या? दुचाकी जाऊ नयेत, याची काळजी का घेण्यात आली नाही? असे प्रश्न उपस्िथत होत आहेत.





