पुणे जिल्हा | बोरी बुद्रुकमध्ये झुकिनीची शेती यशस्वी

बेल्हे, (वार्ताहर) – बोरी बुद्रूक येथील वंदना संतोष गुंजाळ या महिला शेतक-याने झुकिनी या जातीच्या अमेरीकन पालेभाजीची लागवड केली असून यामधून त्यांचा चांगल्या प्रकारचा नफा मिळणार आहे.
बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या ठिकाणाहुन कुकडी प्रकल्पातील कालवा तसेच कुकडी नदी गेल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम झाला असून याच पाण्याच्या जोरावर येथील शेतकरी नवनविन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग महिला शेतकरी असलेल्या वंदना संतोष गुंजाळ यांनी केला आहे.
स्वत: बीए पर्यत शिक्षण घेतले असून पतीच्या निधनानंतर न डगमगता घरची असलेली जवळपास 15 एकर जमीन ते स्वतः करत आहेत व या शेतीमध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन उत्तम प्रकारे शेती आहेत
यासाठी नेहमी ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरत असतात त्या ठिकाणी भेट देत असतात असाच पुणे या ठिकाणी भरलेल्या कृषी प्रदर्शनात झुकिनी या अमेरीकन पालेभाजीची माहीती घेऊन याची शेती कशा पद्धतीने केली जाते याचा अभ्यास केला. व याच भाजीची लागवड करण्याचे ठरवले.
जाधव यांनी यासाठी 20 गुंठे क्षेत्राची यासाठी निवड केली व यामध्ये सुरुवातीला पाच फुटांच्या अंतरावर बेड पाडून या बेडवर शेणखत टाकुन ट्रॅक्टरद्वारे मल्चिंग पेपर टाकुन घेतल्यावर तीन फुटांच्या अंतरावर आळेफाटा येथून झुकनी या जातीची 1500 बिया (30 पुड्या एका पुडीत 50 बिया) 30 ऑगस्ट रोजी आणुन लावल्या.
या पिकाला वेळोवेळी जैविक औषधी फवारणी केल्यानंतर साधारणपणे 40 दिवसानंतर पीक काढता येता.
विशेष म्हणजे हे पीक कोणत्याही महिण्यात घेतले तरी ते चांगले येते. तसेच या पालेभाजीस शहरांमध्ये चांगली बाजारपेठ उपलब्ध असुन हे पीक घेणारी पुणे जिल्ह्यातील पहिला प्रयोग गुंजाळ यांनी केला आहे.
90 हजार ते एक लाखांपर्यंत नफा
या झाडाला फळे आल्यानंतर पहिल्या तोड्यात 163 नग (30 किलो) माल निघाला असून 200 ग्रॅम वजनाचे एका नगाचे कमीत कमी 15 रुपये किंमतीने विक्री होत आहे व अंदाजे 3 टन माल निघणार आहे व यासाठी खर्च 25 ते 30 हजार रुपये खर्च आला असून यामध्ये झालेला खर्च जाता 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळणार आहे.
काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते. झुकिनी या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये (जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ) उपलब्ध असतात. फळाच्या सालीत तंतूमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
हृदयाचे ठोके नियंत्रित करणे तसेच पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी झुकिनी फळ महत्त्वाचे आहे.
तसेच हे पीक घेण्यासाठी सासुबाई मिनाक्षी गणपत गुंजाळ व मुलगा ओंकार यांची मोलाची साथ मिळत आहे.- वंदना गुंजाळ, झुकीना उत्पादक शेतकरी




