न्यूयॉर्क – पुढील महिन्यात न्यूयॉर्क शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक भव्य कार्यक्रम होणार असून त्याची जय्यत तयारी न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरू आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत २४ हजार जणांची उपस्थिती निश्चित झाली आहे. या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी अमेरिकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. मोदी ऍन्ड यूएस – प्रोग्रेस टुगेजर असे या कार्यक्रमाचे नाव असणार आहे. दिनांक २२ सप्टेंबरला न्यूयॉर्कमधील नासावू वेटेरन्स मेमोरियल कोलेसियम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कला जाणार आहेत. दिनांक २६ सप्टंबरला त्यांचे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये भाषण होणार आहे. यानिमित्ताने भारतीय समुदायाशी ते संवाद साधणार आहेत. यासाठी अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या ५९० संघटनांनी एकत्रितपणे प्रयत्न केले आहेत. या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील ४२ प्रांतातील भारतीय समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. उपस्थित राहणाऱ्यांमध्ये ज्यू, झोरोस्ट्रियन, जैन, ख्रिश्चन, शीख, मुस्लिम आणि हिंदू समुदाय देखील असणार आहेत. याशिवाय हिंदी, तेलगू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मल्याळम, गुजराती आणि इतरांसह भारतातील विविध भाषिक मूळ भारतीय देखील उपस्थित असतील.