– श्रीकांत कात्रे
माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंकेने महिलांना सक्षम करण्यासाठी
सातत्याने प्रोत्साहन दिले. व्यक्तिगत व्यवसायात महिला यशस्वी झाल्याच. आणि सामूहिक पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांनाही या संस्थांनी ताकद दिली. भारती भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली प्रेरणा महिला बचत गटाने केलेले काम या चळवळीत महत्त्वपूर्ण ठरले आहेच. शिवाय स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक प्रगती साधण्यास महिलांसाठी उपयुक्त ठरले आहे.
शिवणकामातून स्वतःबरोबर इतर महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात भारती भोसले यशस्वी झाल्या. बॅग बनविण्याच्या छोट्या व्यवसायापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास आता होम फर्निसिंगमधील विविध उत्पादनांच्या निर्मितीपर्यंत पोहचला आहे.
माणदेशीच्या प्रोत्साहनामुळे हे उत्पादन मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून आणि परदेशातही पोहचू लागल्याने त्याला आता उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील भारती भोसले यांना शिवणकामात रस होता. रयत शिक्षण संस्थेमुळे त्यांना पुण्यातील सेंट क्रिस्पिन्स होम येथे प्रशिक्षणाची संधी मिळाली.
नंतर त्यांनी सुरवातीला कॉटनपासून बॅग बनवायचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळोवेळी बॅगमध्ये नाविन्य आणत होत्या. यामध्ये त्यांना काही महिला मदत करत होत्या. या महिलांकडे आर्थिक नियोजन नाही. आर्थिक गोष्टींसाठी किंवा बचतीसाठी काही करणे आवश्यक आहे असे त्यांच्या लक्षात आले.
त्यासाठी त्यांनी 10 जानेवारी 2010 रोजी प्रेरणा महिला बचत गटाची स्थापना केली. छोट्या मोठ्या ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली. माणदेशी फाउंडेशनच्या मुंबई महोत्सवामध्ये सहभाग घेतला. त्यांत 2016 मध्ये त्यांना जवळपास 50 हजार रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर दर वर्षी मुंबई महोत्सवामध्ये ही उत्पादने लोकांचे आकर्षण ठरली.
2019 च्या मुंबई महोत्सवामध्ये तर त्यांना सुमारे दोन लाख रुपये फायदा झाला, त्यानंतर त्यांनी माण देशी मार्फत होणाऱ्या कार्पोरेट 7ेत्रात भविल्या जाणारया प्रदर्शनात सहभाग घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर माणदेशी फाउंडेशनच्या सातारा महोत्सवामध्येही त्यांना दरवेळी साधारण एक ते दीड लाख रुपये फायदा झाला.
गेली दोन वर्षे करोना काळात त्यांनी मास्क बनविण्याचे काम सुरु केले. त्यातून बचत गटातील सर्व महिलांचा घरखर्च अगदी व्यवस्थित चालत होता. करोना काळामध्ये पुरुष घरी बसून असताना महिलांनी सर्व घरखर्च भागवले व घर चालवले याचा प्रेरणा महिला बचत गटातील महिलांना अभिमान वाटतो.
अशाच काळामध्ये त्यांना माणदेशीच्या माध्यमातून त्यांना मेंटरशिप प्रोग्राममध्ये सहभाग मिळाला. त्यांना डीजिटल मार्केटिंग, ऑनलाइन मार्केटिंग, प्रॉडक्ट क्वॉलिटी याबद्दल मार्गदर्शन मिळाले. माणदेशीतर्फे साधारण 1200 कुशन कव्हर व 600 टेबल रनरची ऑर्डर मिळाली आहे. या कामाची किंमत साधारण नऊ लाख 75 हजार रुपये एवढी आहे. एवढी मोठी ऑर्डर प्रथमच मिळाल्यानंतर कामाचे नियोजन करणे व वेळेत ऑर्डर पूर्ण करणे हे फार मोठे कसब होते. पण महिलांच्या प्रामाणिक कष्टामुळे ही ऑर्डर वेळेत पूर्ण झाली.
त्यांना या कामामध्ये साधारण दीड लाख रुपये नफा झाला आहे. शिवाय त्यांना कंपनीकडून एक लाख 11 हजार रुपयांची बॅग करण्याची ऑर्डर मिळाली. ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर त्यांना साधारण 25 ते 30 हजार रुपये नफा झाला. कुशन कव्हर आणि टेबल रनर या कामासाठी खणाच्या कापडाचा वापर करण्याची कल्पना भारतीताईंनी राबविली. तीच गोष्ट या उत्पादनांना आकर्षक व या क्षेत्रातील स्पर्धेत उतरण्यास पूरक ठरली. भारती भोसले यांच्या कन्या पूनम सध्या या महिलांना सर्व कामात मदत करीत आहेत.
बॅंग, विविध प्रकारची कुशन्सची डिझाइन त्या तयार करतात. पॅकेजिंग, वारली पेंटिंगसह विविध कलाकृतींद्वारे उत्पादन आकर्षक व दर्जेदार होण्यात त्यांची मदत होते. प्रेरणा महिला बचत गट या सगळ्याचे श्रेय माणदेशी फाउंडेशनला देतात. केवळ माणदेशीमुळेच प्रगती झाली, असे भारतीताई आवर्जून सांगत होत्या. बचत गटातील महिलांना जिथे पाच हजार रुपये मिळायचे तिथे करोना काळात त्यांना 15 हजार रुपये मिळाले, ही बाब अभिमानाची आहे, असे माणदेशीच्या प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितले.
महिलांना पाठबळ मिळण्यासाठी माणदेशीने ऍक्सेन्चर या संस्थेशी भागीदारी केली. ऍक्सेन्चर, वुई ऍक्ट व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना उत्पादनाच्या अनुषंगाने मार्केटिंग, क्वालिटी, ब्रॅंन्डिंग, जाहिरात, पॅकेजिंग अशा गोष्टींसाठी मार्गदर्शन करते. माणदेशी मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्याशी समन्वय साधते. त्यामुळे महिलांना व्यवसाय वाढण्यास मदत होते. या प्रेरणा महिला बचत गटालाही त्यातूनच मोठी ऑर्डर मिळाली.
त्याशिवाय मुंबईसह विविध ठिकाणची प्रदर्शने, ई- बझार, आठवडा बाजार, फाउंडेशनच्या शाखेद्वारे स्टॉल्स अशी व्यासपीठे माणदेशी मिळवून देते. आठवडा बाजारामध्ये स्टॉल लावण्यासाठी जागा मिळवून देऊन महिलांना मार्केटिंगची सवय लावते. माणदेशीचे महिलांसाठी ई बझारचे व्यासपीठही आता उपलब्ध करून दिले आहे. करोनाच्या काळामध्ये हजारो महिलांनी डीजिटल मार्केटिंगचा वापर करून आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग केले आणि व्यवसाय वाढविला, असे वनिता शिंदे यांनी स्पष्ट केले