पिकविमा प्रश्नी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

श्रीरामपूर – खरीप 2023 या कालावधीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्यांनी मोठा सहभाग घेतला होता. या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संघटनेने पुणे येथे कृषी आयुक्तालयावर जाऊन पाठपुरावा केल्याने राज्यासह जिल्ह्यातील शेतकर्यांना पिक विमा भरपाई मिळण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव जवरे यांनी सांगितले.
एक रुपयात पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, खरीप हंगामात पावसाचा जास्त खंड पडल्याने शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शेतकर्यांना शासन आदेशाप्रमाणे पंचवीस टक्के अग्रीम विमा भरपाई मिळावी म्हणून मागणी लावून धरल्याने शेतकर्यांना 25 टक्के पहिली विमा भरपाई मिळाली.
जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने हंगाम पूर्णतः वाया गेला होता. त्यावेळी उर्वरित नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता, श्रीरामपूर, नेवासा पोलीस ठाण्यांमध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, राज्य सचिव रुपेंद्र काले, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, हरीअप्पा तुवर, नानासाहेब गाढवे, डॉ. रोहित कुलकर्णी यांनी संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे म्हणून फिर्यादीही दिल्या होत्या. संपूर्ण पिक विमा भरपाई मिळावी म्हणून, जवरे यांनी तत्कालीन कृषी आयुक्त, पुणे यांना वेळोवेळी भेटून निवेदने दिली. त्यावेळी जवरे व आयुक्त यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आयुक्त, विधान भवन या ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले होते. शेतकर्यांना जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर अॅड. अजित काळे व अॅड. साक्षी काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते. यासाठी युवराज जगताप, हरीअप्पा तुवर, प्रभाकर कांबळे, अॅड. सर्जेराव घोडे, शरद पवार, लहू मोडवे, अमोल मोडे, नारायण टेकाळे, इंद्रभान चोरमल, डॉ. आदीक, डॉ. नवले, सुदाम औताडे, बबनराव उघडे, शरद असणे, नरेंद्र काले, मेजर काळे, राजेंद्र गोरे, जालिंदर गोल्हार, राजेंद्र उंडे, शरद पठारे, किसन काकडे, ज्ञानदेव पठारे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचे जवरे यांनी म्हटले आहे.





