वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता – चंद्रकांत पाटील

सोलापूर – राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे, शासकीय वसतिगृह न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता देणार आहे. महानगरात राहणाऱ्यांना 6 हजार, तर इतर शहरात राहणाऱ्यांना दरमहा 5 हजार 300 रुपये तर तालुका पातळीवर 3 हजार 800 प्रति महिना भत्ता दिला जाणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटल यांनी दिली.
राज्यातील राजकारणात उलथापालथी होत असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढील शैक्षणिक सत्र 1 जूनपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्व मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार भरणार आहे.
महाराष्ट्रातील मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही असे होणार नाही. मुलींच्या फीसाठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून, लवकरच कॅबिनेटचा निर्णय होऊन जीआर निघणार आहे. त्याचबरोबर ज्या मुला-मुलींना वसतिगृह मिळालेले नाही अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात येणार आहे.
राज्यातील मुला-मुलींना राज्य सरकारकडून आगामी शैक्षणिक क्षेत्रापासून निर्वाह भत्ता दिल्या जाणार आहे. यामध्ये महानगरातील विद्यार्थी-विद्यार्थीनीना दरमहा 6 हजार, त्यापेक्षा लहान शहरांमध्ये 5 हजार 300 तर तालुका स्तरावर 3 हजार 800 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. हा भत्ता डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे.





