- हिंजवडी येथील घटना
पिंपरी – चोराला पकडण्याचे काम पोलीस करतात. मात्र एका महाभाग उपनिरीक्षकाने तक्रारदार तरुणीच्या घरी चहा पिण्याच्या बहाण्याने जाऊन त्यांचे महागडे घड्याळ चोरले. ही बाब उघडकीस येताच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शनिवारी (दि. 30) त्याला निलंबित केले.
या प्रकरणी प्रशांत राजेंद्र रेळेकर असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. एका 25 वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेळेकर हा हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे. तक्रारदार तरुणीचा भाऊ बेपत्ता झाला आहे.
याबाबत 24 एप्रिल रोजी तरुणी तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली. त्यावेळी तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. दरम्यान, गाडीमध्ये आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो, मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला चाललो आहे. तू पण माझ्या सोबत चल. असे बोलून लगट करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला.
घरी पोहचल्यानंतर रेळेकर याने आपण खूप कंटाळलो आहे, असे सांगून तरुणीकडे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आई देखील घरात होत्या.
दरम्यान, चहा पिताना रेळेकर याने “चार्जिंग’ला लावलेला ऍपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले. त्यानंतर तरुणीने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकर याने तरुणीचे घड्याळ माघारी दिले.
रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जर कोणीही गैरप्रकार करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. सगळीकडे असे प्रकार घडत असतात. मात्र, पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली जाईल या भीतीने प्रकरण दाबण्यात येते. मात्र, माझ्याकडे चुकीला माफी नाही. मी कोणालाही पाठीशी घालणार नाही.
– कृष्णप्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.