Asia Cup Schedule : मैदानावर पुन्हा पेटणार भारत-पाक युद्ध! आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार हायव्होल्टेज मुकाबला
Asia Cup Schedule : आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळीही भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

Men’s Asia Cup Rising Stars 2026 Schedule Announced : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) ‘मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६’ स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंदाही पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ही बहुप्रतिक्षित स्पर्धा कतारची राजधानी दोहा येथे रंगणार असून, आठ देशांच्या युवा संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल.
२२ नोव्हेंबरला रंगणार भारत-पाक महासंग्राम –
भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्धच्या लढतीने करेल. यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ यांच्यात थरारक महामुकाबला रंगणार आहे. ग्रुप स्टेजमधील आपला तिसरा आणि अखेरचा सामना भारतीय संघ संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळेल.
स्पर्धेचे स्वरूप आणि मैदानांचे नियोजन –
Last edition was a blockbuster and Qatar is ready for another round of fireworks 🧨
𝐓𝐡𝐞 #𝐃𝐏𝐖𝐨𝐫𝐥𝐝𝐌𝐞𝐧𝐬𝐀𝐬𝐢𝐚𝐂𝐮𝐩𝐑𝐢𝐬𝐢𝐧𝐠𝐒𝐭𝐚𝐫𝐬𝟐𝟎𝟐𝟔 𝐫𝐞𝐭𝐮𝐫𝐧𝐬 𝐨𝐧 𝟏𝟗 𝐍𝐨𝐯𝐞𝐦𝐛𝐞𝐫 ⭐
#ACC https://t.co/rCZGF9JCYI
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 24, 2026
स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांची विभागणी दोन गटांत करण्यात आली आहे. ग्रुप ‘ए’ मध्ये श्रीलंका ‘अ’, बांगलादेश ‘अ’, अफगाणिस्तान ‘अ’ आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे, तर ग्रुप ‘बी’ मध्ये भारत ‘अ’, पाकिस्तान ‘अ’, नेपाळ आणि युएई आमनेसामने असतील. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ नोव्हेंबरला, तर महाअंतिम सामना २९ नोव्हेंबर रोजी वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर पार पडेल. स्पर्धेचा सलामीचा सामना १९ नोव्हेंबर रोजी युनिव्हर्सिटी ऑफ दोहा (UDST) मैदानावर होईल.
गेल्या हंगामातील सुपर ओव्हरची सल पुसण्याचा भारताचा निर्धार –
🚨 INDIA A vs PAKISTAN A! 🇮🇳🇵🇰
The rivals are set to clash on November 22 in the Asia Cup Rising Stars tournament in Doha! https://t.co/JfjS2Thmx6
— Daily Orbit (@DailyOrbit8) October 25, 2026
गेल्या हंगामात भारताचे नेतृत्व जितेश शर्माकडे होते आणि वैभव सूर्यवंशीही त्या संघात खेळला होता. मात्र, उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अखेर अंतिम फेरीत पाकिस्तानने बांगलादेशला हरवून जेतेपदावर नाव कोरले होते. गेल्या वर्षीच्या या कटू आठवणी मागे सारून यंदा विजेतेपदावर मोहोर उमटवण्याचा भारतीय युवा ब्रिगेडचा पक्का इरादा असेल.
कर्णधारपदाची धुरा कोणाकडे? सर्वांचे लक्ष
आशिया कपच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी बीसीसीआय लवकरच भारत ‘अ’ संघाची घोषणा करणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या नव्या हंगामात भारतीय संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवले जाते आणि संघात कोणाची निवड होते, याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.





