Satara: विद्यार्थ्यांना आता एसटी पासऐवजी मिळणार स्मार्ट कार्ड
Satara या स्मार्ट कार्डमुळे कागदी पास फाटण्याचा धोका नाही.

Satara: डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी असलेले कागदी पास बंद करून, डिजिटल एनसीएमसी स्मार्ट कार्ड लागू केले आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून हे कार्ड सुरू करण्यात येत आहे.
या स्मार्ट कार्डमुळे कागदी पास फाटण्याचा धोका नाही. या योजनेची अंमलबजावणी, देखभाल आणि कार्ड वितरणाचे काम इक्चिबस टेक्नॉलॉजी आणि एनएसडीएल पेमेंटस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणार्या सवलतीच्या मासिक पाससाठी हे कार्ड आवश्यक राहणार आहे.
विद्यार्थ्यांना सरल अथवा अपार क्रमांक आणि त्यास जोडलेला शासकीय ओळख क्रमांक उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. या कार्डमुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीच्या वाहकाला कागदी पास दाखवायची गरज नाही. कार्ड मशीनवर टॅप केले की, विद्यार्थ्यास सवलत योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांची पात्रता तपासून कार्ड नोंदणी केली जाईल.
आगारातील किंवा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत प्रतिनिधीकडून नोंदणी होण्यासाठी विद्यार्थी अथवा पालकांचा फोन नंबर देणे अनिवार्य असेल. आवश्यक शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पावती देण्यात येईल. नोंदणी झाल्यानंतर साधारण 30 दिवसांच्या आत कार्ड संबंधित आगारात उपलब्ध करून दिले जाईल. त्यानंतर पॉस मशिनद्वारे कार्ड सक्रिय करून ते विद्यार्थ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.




