Shrirampur News : श्रीरामपूर बसस्थानकाची जागा शासनाचीच ; अडथळा आणल्यास थेट गुन्हे दाखल करा – परिवहन मंत्री सरनाईक

प्रभात वृत्तसेवा
श्रीरामपूर – श्रीरामपूर येथील एसटी महामंडळाची जमीन ही शासनाची असून, यासंबंधी ७/१२ आणि ८ अ वर काही नोंदी राहिले असतील तर त्या १ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून बसस्थानकाचे काम तातडीने चालू करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले.आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर येथील बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सदर जागेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
त्याअनुषंगाने तातडीने परिवहन मंत्री सरनाईक यांना पत्र लिहून बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज मंत्रालय येथे मंत्री सरनाईक यांच्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसटीचे विभाग नियंत्रक, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.
आ.ओगले यांनी मंत्री सरनाईक यांना निदर्शनास आणून दिले की, श्रीरामपूर येथे बसस्थानकाचे काम मंजूर असून परंतु जागेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले आहे. याचाच फायदा घेऊन काही गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे ताबा मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमिलेख अधिकारी यांना तातडीने जागेच्या संदर्भातील उताऱ्यांवर शासनाच्या नोंदी करण्याचे आदेश दिले.
एक नोव्हेंबरपर्यंत कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणेला दिले आहे. त्यामुळे लवकरच श्रीरामपूर येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम चालू होणार आहे. कामात कुणी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. आमदार ओगले यांच्या सतर्कतेमुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागा बळकवण्याचा प्रयत्न फसला आहे.





