Indapur : क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ देणार
Indapur : पै. अनुष्का हासपे हिने ५३ किलो वजनी गटात उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले. अनुष्का हिने यापूर्वी राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही सहभाग नोंदविला आहे.

इंदापूर : गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना योग्य दिशा देऊन त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याच्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.कळंब-वालचंदनगर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करीत दमदार कामगिरी केली. या यशामुळे महिला गटातील सर्वसाधारण उपविजेतेपदाचा मानही महाविद्यालयाला मिळाला.
पै. अनुष्का हासपे हिने ५३ किलो वजनी गटात उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले. अनुष्का हिने यापूर्वी राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही सहभाग नोंदविला आहे. तर पै. समर्थ शिंदे याने ९२ किलो वजनी गटात चुरशीच्या व उत्कंठावर्धक लढतींमध्ये नामांकित प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. महाविद्यालयाच्या या तिन्ही खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत होणाऱ्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, मुख्य सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग व राही रणसिंग यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत शिंदे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी यांनीही खेळाडूंचे कौतुक केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
अहिल्या शिंदेची जागतिक अजिंक्यपदसाठी निवड
सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रणसिंग महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. पै. अहिल्या शिंदे हिने ५५ किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांचा एकतर्फी पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे अहिल्या शिंदे हिची अमेरिकेत होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व आयोजक महाविद्यालयाच्या वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय हे केवळ पदवी देणारे महाविद्यालय नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणारे शिक्षणकेंद्र आहे. अहिल्या शिंदेची भारतीय संघात झालेली निवड, अनुष्का हासपे आणि समर्थ शिंदे यांची सुवर्ण कामगिरी ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच महाविद्यालयातील क्रीडा संस्कृतीचे फलित आहे.
-वीरसिंह रणसिंग, मुख्य सचिव, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान.





