School Controversy : विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणू नये; भाजप आमदाराच्या शाळेचा अजब फतवा, मनसेचा दणका
Narendra Mehta School Controversy : मनसेच्या इशाऱ्यानंतर शाळा प्रशासनाने आदेश मागे घेतला

Narendra Mehta School Controversy : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची मिरा रोड येथे सेव्हन इलेव्हन शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थांना जैन धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण काळादरम्यान शाळेत विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बीट खाऊ नये अथवा विद्यार्थ्यांनी डब्यात आणू नये, असे आवाहन करण्यात आले होते. याबाबत शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करण्यात आला होता.
या मेसेजवर तसेच शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर राज्यभरातून टीका करण्यात आली. तसेच मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने नरेंद्र मेहता यांना नोटीस धाडली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत शाळेने लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले.
खुलासा समाधानकारक नसल्यास शालेय संहिता आणि बालकांच्या हक्कांनुसार कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
मनसेचा आक्रमक इशारा
मराठी माणसांची मुलं आणि विद्यार्थी काय खाणार हे ठरवणारे शाळा कोण, असा सवाल मनसेचे सचिन पोपळे यांनी उपस्थित केला. ही शाळा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची असल्याचा दावा करत, उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू केली आणि गटारीच्या वेळी विद्यार्थ्यांना चिकन, मटण आणि अंडी आणण्यास सांगितले, तर ते मान्य केले जाईल का, असा प्रश्नही मनसेकडून उपस्थित करण्यात आला.
तसेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी सायंकाळपर्यंत फतवा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर काही वेळातच शाळेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून तो फतवा हटवला. मनसेच्या इशाऱ्यानंतर शाळा प्रशासनाने हा आदेश मागे घेतला आहे.
दरम्यान, मीरा भाईंदर येथील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत हा प्रकार घडला. ‘सेवन इलेव्हन एज्युकेशन सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही संस्थेशी संबंधित आहेत. या प्रकरणामुळे आता शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा:






