Bangladesh : मृतांचा नेमक्या आकडेवारीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन; बांगलादेशातील विमान अपघातानंतर देशभर दुखवटा

Bangladesh – बांगलादेशात हवाई दलाचे प्रशिक्षणासाठीचे विमान शाळेच्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात यावी आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी विमान पडलेल्या माईलस्टोन स्कूल ॲन्ड कॉलेजसह आजूबाजूच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
बांगलादेश हवाई दलातील तांत्रिकदृष्ट्या बाद झालेली आणि असुरक्षित असलेली प्रशिक्षणाची विमाने तात्काळ सेवेतून बाद करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कायदा सल्लागार आसिफ नजरुल, शिक्षण सल्लागार सीआर अबरार आणि मुख्य सल्लागारांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी अपघातस्थळाला भेट दिली. या सर्वांना विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी आपल्या मागण्यांसाठी यावेळी प्रचंड घोषणाबाजी केली. नागरिकांच्या रोषापासून बचाव करण्यासाठी सल्लागारांना जवळच्या एका शाळेच्या इमारतीत आश्रय घ्यावा लागला. लष्कर आणि निमलष्करी दलाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवला असतानाही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी या इमारतीला वेढा घातला.
प्रशासनाकडून मृतांची आकडेवारी जाणीवपूर्वक दडवली जात असल्याचा आरोप यावेळी केला गेला. विद्यार्थ्यांचा हा आरोप युनूस यांच्या कार्यालयाच्यावतीने फेटाळला आहे. अनेक पालक अपघातानंतर त्यांच्या हरवलेल्या मुलांना रात्रभर शोधत होते, असे शाळा प्रशासन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अनेक मुले इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या अपघातात मरण पावलेल्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी बांगलादेशात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला. देशभरातील न्यायालयांमध्येही एक मिनिटाचे मौन पाळून मृतांना आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान बांगलादेश हवाई दलाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.





