पुणे | मायदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदिच्छादूत व्हावे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) च्या पुणे उपक्षेत्रीय कार्यालयातर्फे परदेशी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ज्या परदेशी विद्यार्थ्यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे आणि आता मायदेशी परत जात आहेत, अशा १२० विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नाव एक्झिट-एंगेजमेंट- इव्हिनिंग (ट्रीपल ई-३) असे होते. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या उपमहासंचालिका अंजू रंजन (आयएफएस) उपस्थित होत्या, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध देशांतील सुमारे १२० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.
भारत सरकारच्या विविध मंत्रालयांतील आणि विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात मालती दत्त, प्रसाद बच्छाव, बसवराज, डॉ. गजानन पवार, देबमाल्या बॅनर्जी यांचा समावेश होता.
जनस्वती (बांगलादेश), वली रहमानी (अफगाणिस्तान), अप्पाडू मनुप्रिया (मॉरिशस), मकारा यान (कंबोडिया), इस्माईल आब्दी (सोमालिया) या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुप्रिता लेले यांनी सूत्रसंचालन केले, तर राज कुमार यांनी प्रास्ताविक केले.
पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. विविध सांस्कृतिक उपक्रमांनी परदेशी विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळाले आहेत. या स्मृती आणि शिदोरी घेऊन या विद्यार्थ्यांनी पुढे जावे. मायदेशी प्रगती करावी, असे डॉ. काळकर म्हणाले.
सांस्कृतिक परिषद ४ हजार विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठात प्रवेश देते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ट्रीपल-ई -३ या कार्यक्रमातून परदेशी मायदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्याना विविध क्षेत्रांतील कारकिर्दीविषयी मार्गदर्शन केले जाते. अॅल्युमनाय कार्ड या विद्यार्थ्यांना दिले जाते आणि वेब पोर्टलद्वारे उपक्रमांची माहिती दिली जाते. भारतातील शैक्षणिक अनुभव संपन्न करणारा आहे. त्यातून भारताचे या देशांशी संबंध दृढ होतील. मायदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदिच्छा दूत व्हावे, असे रंजन या वेळी म्हणाल्या.




