Student Protest: विद्यार्थ्यांनी खड्ड्यांनाच वाहिली फुलं! मावळात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात शाळकरी मुलांचा संताप
Student Protest: कान्हे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल; रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालून विद्यार्थ्यांनी केला प्रशासनाचा पंचनामा.

Student Protest – देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके उलटली. देशाने चंद्रावर पाऊल ठेवले. डिजिटल भारताच्या घोषणा झाल्या. गावोगावी विकासकामांची आश्वासने दिली जात आहेत. मात्र मावळातील कान्हे येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. एवढेच नव्हे, तर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घातला, त्यांचे पूजन केले.
या अनोख्या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा अक्षरशः पंचनामा केला. यावेळी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कान्हे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यात अवजड वाहनांची संख्या लक्षणीय आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन गेल्यानंतर चिखलाचे पाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते. खड्ड्यांमध्ये दगड-माती साचल्याने दुचाकीस्वारांनाही वाहन चालविताना कसरत करावी लागते. अचानक खड्डा आल्याने दुचाकी घसरून किरकोळ अपघात होण्याच्या घटनाही घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पावसाळ्यात या समस्येची तीव्रता आणखी वाढते. त्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांनाही मुलांना शाळेत पाठविताना चिंता वाटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खड्डे बुजविण्याचे तात्पुरते काम सुरू झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र अवजड वाहतुकीमुळे वारंवार रस्ता खराब होत असल्याने सिमेंट काँक्रीटचा प्रस्तावित रस्ता प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत आहे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांची आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. रस्त्यावरून शाळेत ये-जा करताना दररोज धोका पत्करावा लागत आहे. पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना अपघाताचा धोका वाढतो. प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष काम करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
“लवकरच त्या ठिकाणी खड्डे बुजविण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. कान्हे येथील रस्त्यावर सिमेंट काँक्रीट करण्याचे काम मंजूर झाले आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल.”
– अनिल जाधव, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग






