Pimpri Road Condition: पिंपरीतील रस्त्याची चाळण! खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; प्रशासनावर नागरिकांचा संताप
Pimpri Road Condition: जयहिंद शाळा आणि पवना बँक परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे; पावसामुळे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांचे तोल जाऊन अपघातांचे सत्र सुरू.

Pimpri Road Condition – पिंपरीतील जयहिंद शाळा आणि पवना सहकारी बँक परिसरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जयहिंद शाळेमुळे सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी असते. तसेच परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकही याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे झाकले जात असल्याने वाहनचालकांचा तोल जाण्याचे प्रकार घडत आहेत.
विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. ही समस्या वारंवार निदर्शनास आणून देऊनही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अनेक पादचारी या मार्गाचा वापर करतात. काही टवाळखोर मुद्दामून पाणी साचलेल्या खड्ड्यातून जोरात वाहन नेतात.
यामुळे रस्त्यावरील घाण पाणी अंगावर उडते. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळा लक्षात घेऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.





