Student Protest Pimpri: पिंपरीत नीट पेपरफुटीविरोधात एल्गार! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन
Student Protest Pimpri: नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात पिंपरी चौकात आंदोलन; 'सीजेपी'ला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला, मोरवाडी मार्गावरील वाहतूक बंद.

Student Protest Pimpri – नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणावरून काॅक्ररोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन दर्शवित पिंपरी चौकातही आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी पेपर फुटी थांबवा,
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या…अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नीट परीक्षेतील गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोरवाडी चौकातून येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे वाहनचालकांना वळसा मारुन जावे लागले.
विद्यार्थ्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत पेपर फुटी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आमच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. त्यासोबतच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना रोखले
आंदोलन सुरू असताना अनेक विरोधी पक्षाचे राजकीय पदाधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित होते. आंदोलनाच्या व्यासपीठावर उभे राहत या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन हातात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांना रोखले. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे असून आमच्या भवितव्यासाठी आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उभे राहत आंदोलन भरकटवू नये. विद्यार्थ्यांना बोलू द्यावे, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ असल्याचे विद्यार्थ्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.





