Thackeray brothers : नीट पेपरफुटी प्रकरण तापणार! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधू मैदानात; केली मोठी घोषणा
Thackeray brothers : ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यांदर्भात नुकत्याच घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

Major announcement by the Thackeray brothers : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू असतानाच आता मुंबईतही या आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.
ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यांदर्भात नुकत्याच घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) २६ जुलै (रविवार) रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. या मोर्चात इतर राजकीय पक्षांना देखील सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी उद्यान (शिवाजी पार्क) ते सिद्धिविनायक मंदिर असा काढण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
अपयशाची जबाबदारीही स्वीकारावी लागते
ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागणीवर केंद्र सरकावर सडकून टीका केली. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात आहे, त्यांच्यावर लाठीमार केला जात आहे. कोणतेही पद स्वीकारल्यानंतर त्या पदाशी संबंधित यशाइतकीच अपयशाची जबाबदारीही स्वीकारावी लागते. हीच विद्यार्थ्यांची मागणी आहे.”
राज ठाकरेंकडून त्या घटनांचा उल्लेख
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या घटनांचाही संदर्भ देत भाजपवर टीका केली. “भाजप विरोधी पक्षात असताना अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागत होता. रझा अकादमी प्रकरणात आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. तसेच २६/११ मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांचाही राजीनामा घेण्यात आला होता.”






