Student Missing – दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी वडिलांसोबत शाळेत आलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित विद्यार्थिनी उरुळी कांचन परिसरातील एका नामांकित विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. बुधवारी (दि. 18) सकाळी साडेनऊच्या सुमारास भूगोलाचा शेवटचा पेपर देण्यासाठी तिचे वडील तिला महात्मा गांधी विद्यालयाच्या गेटवर दुचाकीवरून सोडून गेले.शेवटचा पेपर असल्याने वडील तिला गेटवर सोडून घरी परतले. मात्र, दुपारी साडेबारा वाजता शाळेतील शिक्षकांनी फोन करून विद्यार्थिनी परीक्षेला उपस्थित नसल्याची माहिती दिली. यानंतर वडिलांनी तातडीने शाळेत धाव घेतली. मी सकाळी तिला गेटवर सोडले होते, असे त्यांनी सांगितले, मात्र ती वर्गात परीक्षेसाठी बसलीच नव्हती. यानंतर नातेवाईक आणि शिक्षकांनी परिसरात शोध घेतला, मात्र मुलगी आढळून आली नाही. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.