भुवनेश्वर : लैंगिक छळामुळे व्यथित झालेल्या ओडिशातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने नुकताच आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या त्या विद्यार्थिनीची उपचारांवेळी प्राणज्योत मालवली. त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर ओडिशात संतापाची लाट उसळली आहे. दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेससह ८ विरोधी पक्षांनी १७ जुलैला ओडिशा बंद पुकारला आहे. मृत्युमुखी पडलेली विद्यार्थिनी बालासोर जिल्ह्यातील फकीर मोहन महाविद्यालयात इंटिग्रेटेड बी.एड. चे शिक्षण घेत होती. तिने एका प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यासंदर्भात तक्रार देऊनही कुठली कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थिनीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तिने शनिवारी महाविद्यालयाच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेतले. त्यामध्ये ती ९५ टक्के भाजली. तिला उपचारांसाठी प्रथम बालासोर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून तिला पुढील उपचारांसाठी भुवनेश्वरच्या एम्समध्ये हलवण्यात आले. तिथेच तिने सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. संबंधित पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण ओडिशा हादरला. आता तिचे निधन झाल्याने सर्वच स्तरांतून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.