Student Accident – रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ७) सायंकाळी साडेतीनच्या सुमारास औंध-रावेत बीआरटी रोडवरील सांगवी फाटा बीआरटी बस स्थानकाजवळ घडली. सोहम दीपक व्यास (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (डेटा सायन्स) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. कॉलेज सुटल्यानंतर सोहम घरी परतत असताना पायी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी बीआरटी लेनमध्ये आल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सोहमला तातडीने औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सोहमचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोहमच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, मोठी बहीण, काका-काकू आणि चुलत बहीण असा परिवार आहे. अल्पवयात झालेल्या त्याच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोहम हा दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे आवृत्तीप्रमुख सुरज व्यास यांचा पुतण्या होता.