Satara | दिग्गजांचे उद्या, परवा जोरदार शक्तीप्रदर्शन

सातारा, (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दिग्गज उमेदवारांनी केली आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, माणचे आमदार जयकुमार गोरे,
मनोज घोरपडे, आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, हर्षद कदम हे उद्या सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी तर मंगळवारी २९ रोजी आमदार मकरंद पाटील व कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे हे अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार घमासान सुरू आहे. ज्यांना पक्षांचे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्यांनी बैठका मेळावे, घ्यायला सुरुवात केली आहे. ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही ते अजूनही आपले नाव घोषित होईल या आशेने मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. तसेच आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी केली आहे.
भाजपने जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये पहिल्या यादीत सातारा-जावळीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसले यांची उमेदवारी जाहीर केली होती. यापैकी डॉ. अतुल भोसले यांनी शुक्रवारी फारसे शक्तीप्रदर्शन न करता अर्ज दाखल केला होता.
भाजपच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाकडून कोरेगावचे महेश शिंदे व पाटणमधून शंभुराज देसाई यांचे उमेदवारी जाहीर करण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांचे नाव जाहीर केले. आज कराड उत्तर मधून मनोज घोरपडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे.
महायुतीच्यावतीने वाई, सातारा जावळी, कोरेगाव, पाटण, माण, कराड दक्षिण, कराड उत्तर या मतदारसंघातील उमेदवारी निश्चित झाली आहे.
महाविकास आघाडीकडून कोरेगाव मधून आमदार शशिकांत शिंदे व कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. असे दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्याच्या तयारीत आहे.
मकरंद पाटील त्यांच्या वाढदिवशी म्हणजे मंगळवार, दि. २९ रोजी अर्ज दाखल करतील. शशिकांत शिंदे यांनी सुध्दा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे धोरण ठेवले आहे.
सोमवार आणि मंगळवारचा दिवस हा त्या त्या मतदारसंघात उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाचा दिवस ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या समर्थक बैठकांचे गतिमान सत्र सुरू झाले आहे.





