पुणे – संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो, त्यागाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. त्यामुळे युपीएससी निकालात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी तयारीच्या काळात केलेला त्याग मी समजू शकतो अशी भावना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केली. द युनिक अकॅडमीच्या युपीएससी निकालातील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात विकास ढाकणे बोलत होते.
युपीएससीमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढावे यासाठी द युनिक अकॅडमी सुरूवातीपासून प्रयत्न करीत आहे. परिक्षेच्या गरजा ओळखून केले जाणारे मार्गदर्शन आणि दर्जेदार संदर्भसाहित्य यामुळे विद्यार्थ्यांचे यश सुकर होत असल्याचे सांगत ढाकणे यांनी द युनिक अकॅडमीचे अभिनंदन केले. 2022 च्या युपीएससी निकालात द युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतलेल्या 45 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांचा सत्कार व अनुभवकथन कार्यक्रम पार पडला. युनिकचे संचालक तुकाराम जाधव यांनी प्रास्ताविकात सत्कार समारंभामागची भूमिका विषद केली. तळागाळातील विद्यार्थ्यांनी युपीएससीमध्ये मिळविलेले यश हे अभिमानास्पद आहे. युपीएससी निकालात मराठी टक्का वाढविण्यासाठी युनिक करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जाधव यांनी दिली.
यावेळी युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेल्या एनसीईआरटी आधारित पुस्तक मालिका, पॉलिटिकल सायन्स थ्रू क्वशन्स अँड अन्सर्स तसेच अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लीफाईड व पंतप्रधान पीक विमा योजना – महाराष्ट्र एक मूल्यमापन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. युपीएससी आणि वर्णनात्मक एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतील असा विश्वास तुकाराम जाधव यांनी व्यक्त केला.
यशवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसमवेत सत्कार यावेळी करण्यात आला. यशवंत विद्यार्थ्यांनी युपीएससी तयारीची प्रक्रिया विषद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच युनिक अकॅडमीमधील सर्व शिक्षकांचे नियमित युपीएससी मार्गदर्शन वर्ग, अद्ययावत संदर्भसाहित्य, परीक्षाभिमुख सराव चाचण्या व विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष यांमुळे यश सुकर होत असल्याची भावना यशवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. वसंत दाभोलकर, जैनम जैन, प्रतिक जराड, सोहम मांढरे, शृतिषा पठाडे, मंगेश खिलारी, ओमकार गुंडे, सागर खर्डे, मोहम्मद हुसेन, राजश्री देशमुख, अक्षय नेर्ले, सागर देठे, आदित्य पाटील, तुषार पवार या यशवंतांनी सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा विकास ढाकणे, युनिक चे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील व शिक्षक उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत व अनुभव कथन ऐकण्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजेरी लावली. महेश शिरापुरकर यांनी सूत्रसंचालन केले तर भारत पाटील यांनी आभार मानले.