चिंबळी: तळेगाव ते उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे लोहमार्गाला खेड तालुक्यातील कुरुळी पंचक्रोशीतील शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात कुरुळी (ता. खेड) येथे नुकतीच सभा आयोजित करण्यात आली होती. कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव आदी गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या या रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध असून, सरकारने विश्वासात न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सभेत परिसरातील ग्रामपंचायतींमार्फत ग्रामसभा घेऊन रेल्वे लोहमार्गाविरोधात ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांना सादर केला जाणार असून, पुढील आंदोलनासाठी कृती समिती स्थापन करण्याचे नियोजन आहे. नागरिकांचा आक्रोश, गुंठेवारीतील घरांना धोका- प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे परिसरातील गुंठेवारी पद्धतीने जमीन घेऊन बांधलेली अनेक कामगारांची घरे धोक्यात आली आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सभेला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पीएमआरडीए सदस्य वसंत भसे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, माजी सभापती विलास कातोरे यांच्यासह सुमारे तीनशे शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रकल्प बाधित नागरिक उपस्थित होते. काय म्हणाले दिलीप मोहिते पाटील? माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, “तळेगाव-उरुळी कांचन रेल्वे लोहमार्गाला कुरुळी पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांसमोर निवेदन सादर करून चर्चा करू.” वसंत भसे यांचा गंभीर आरोप – पीएमआरडीए सदस्य वसंत भसे यांनी सांगितले, “तळेगाव-उरुळी कांचन रेल्वे मार्गाच्या डीपीआरला पुणे महानगर नियोजन समितीची मान्यता अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे हा डीपीआर बेकायदेशीर ठरतो.” दरम्यान, स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी एकजुटीने या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार केला आहे. ग्रामसभांमधून ठराव मंजूर करून आणि कृती समिती स्थापन करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचे नियोजन आहे.