Dilip Mohite Patil : “…तर राजकारणातून संन्यास घेईन, पण…”; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने स्पष्ट केली भूमिका
Dilip Mohite Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मोहिते पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधत भूमिका स्पष्ट केली आहे.

Dilip Mohite Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पुणे जिल्ह्यातील खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना स्वतःच दिलीप मोहिते पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.
“पक्षनिष्ठा अबाधित आहे, भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही,” असे विधान करत त्यांनी राष्ट्रवादीतच कायम राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर आला होता. मात्र, माध्यमांशी संवाद साधताना दिलीप मोहिते पाटील यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
“मी जिथे आहे तिथे समाधानी आहे. दुसऱ्या पक्षात जाण्याचा कोणताही विचार नाही. पक्षाला धोका देण्याचा प्रश्नच नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, “अशी वेळ आली तर राजकारणातून संन्यास घेईन, पण राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन होईल असे कोणतेही पाऊल उचलणार नाही,” असेही ठामपणे नमूद केले.
दरम्यान, रविंद्र चव्हाण यांच्यासोबतची भेट ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाल्याचे सांगितले जात आहे. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. तसेच पक्षातील काही निर्णयांवर नाराजी असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, दिलीप मोहिते पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.





