Dilip Mohite Patil : “या आमदारांचे पद रद्द होणार”..दिलीप मोहितेंचा मोठा दावा; खेडच्या राजकारणात खळबळ
Dilip Mohite Patil : कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आणि मोजक्याच ठेकेदारांना झुकते माप; निष्पक्ष चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

Dilip Mohite Patil – खेड तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आमदार बाबाजी काळे यांच्या कामकाजावर जोरदार टीका केली. आयोजित पत्रकार परिषदेत निधीअभावी रखडलेली विकासकामे, कथित भ्रष्टाचार व कारभारातील त्रुटींवर गंभीर आरोप करण्यात आले. पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे, माजी सदस्य शरद बुट्टे, अशोक खांडेभराड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा संदर्भ देत, खेड तालुक्याला सलग दुसर्या वर्षी अपेक्षित निधी मिळालेला नाही. जिल्हा नियोजन आराखड्यात तालुक्याची उपेक्षा होत असून त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत, असा आरोप केला. तालुक्यातील अनेक कामे पाठपुराव्याअभावी रखडल्याचे सांगत सुरू असलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करण्यात आली.
माझ्या कार्यकाळात अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे मार्गी लावली होती, असे मोहिते यांनी नमूद केले. स्मार्ट स्कूल योजनेतील कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित विभागाकडे तक्रार दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. याशिवाय खेड तालुक्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
जाहिरातींमध्ये कोटींची कामे; प्रत्यक्षात शून्य’
आमदार काळे यांच्यावर टीका करताना मोहिते म्हणाले, जाहिरातींमधून हजारो कोटींच्या कामांचा गाजावाजा केला जातो; मात्र प्रत्यक्षात ठोस काम दिसत नाही. हा केवळ दिखावा असून जनतेची दिशाभूल केली जात आहे. शासकीय कामे काही मोजक्या ठेकेदारांकडेच दिली जात असल्याचा आरोप करत अधिकार्यांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले. आमदारांच्या निकटवर्तीयांकडून गाड्यांवर ‘आमदार’ लोगो वापरल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
आमदारकी रद्द होईल
शेवटी बोलताना दिलीप मोहिते म्हणाले, येणार्या दोन-तीन महिन्यांत न्यायालयाचा निर्णय अपेक्षित असून, बाबाजी काळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेली माहिती खोटी असल्यामुळे त्यांचे पद रद्द होईल, असा दावा त्यांनी केला. जनतेने आम्हाला नाकारले असले, तरी मतदानाच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आजही पुढे आहे. खेड तालुक्यावर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.






