आळंदी : आळंदी नगरपरिषदेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कर्मचारी नेमण्यात आले असून, अशा व्यक्तींवर ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान कचरा टाकणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुरावे गोळा केले जात आहेत. दंड आकारल्यानंतर संबंधित व्यक्तींना अधिकृत पावतीही दिली जात आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत असून, उघड्यावर कचरा टाकण्याच्या सवयीवर नियंत्रण येत आहे. नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की, घंटागाडी उपलब्ध असतानाही उघड्यावर कचरा टाकणे हा नियमबाह्य वर्तनाचा प्रकार असून, अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ते कचरा केवळ घंटागाडीतच टाकावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. “स्वच्छता हीच जबाबदारी” या भावनेने सर्वांनी पुढे यावे, अशी विनंती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केली आहे. नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषदेच्या या पुढाकारामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.