कात्रज – येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा मुसळधार पावसामुळे थेट रस्त्यावर वाहून आल्याने आज सकाळी कात्रज चौक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. महारपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना भरपावसात प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले. शहराच्या पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील गोळा होणारा सुमारे ३५० ते ४०० टन कचरा दररोज कात्रज येथील केंद्रात आणला जातो. मात्र, येथील अयोग्य व्यवस्थापन आणि केंद्राच्या तुटलेल्या भिंतींमुळे आज सकाळी झालेल्या पावसाच्या पाण्यात हा कचरा थेट उतारावरून वाहत स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि कात्रज डेअरी समोरील चौकात जमा झाला. कचरा मिश्रित पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. या केंद्रातील सुका कचरा अनेकदा ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आणि पदपथावर येत असतो. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. आजच्या प्रकारामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेनंतर प्रकल्पातील आरोग्य निरीक्षकांमार्फत स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांनी रस्ता स्वच्छतेचे काम हाती घेतले असले, तरी साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी कायम होती. प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही प्रभातने कात्रज हस्तांतरण प्रकल्पाची पडलेली भिंत व त्यामुळे झालेला धोका निर्माण व आरोग्याशी हेळसांड व भिंतीला गेलेले तडे याबाबत घनकचरा व्यवस्थापन यांच्या कारभाराबाबत वृत्त दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आजचा प्रकार घडला. ‘कचरा हस्तांतरण प्रकल्प उतारावर असल्याने, दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोड्याफार प्रमाणात कचरा रस्त्यावर आला होता. तो तत्काळ स्वच्छ केला. पडलेली संरक्षक भिंत व कचरा हस्तांतरण प्रकल्प अंतर्गत असलेल्या समस्या याबाबत निविदा काढण्यात येत असून, ही समस्या तत्काळ दूर करण्यात येतील.’ – निखिल ढाले, कनिष्ठ अभियंता, घनकचरा व्यवस्थापन.