चिंबळी –आळंदी फाटा ते आळंदी रस्त्यालगत वनविभागाच्या हद्दीत असलेले रोटाई माता देवीचे मंदिर आणि पांडवकालीन तळे हा एकेकाळचा निसर्गरम्य परिसर आज अक्षरशः कचरा व प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. या तळ्याभोवती सर्वत्र कचर्याचे ढिगारे, प्लास्टिक व रासायनिक घाण साचून तळे म्हणजे कचर्याचे आगार बनले आहे. दुर्गंधी इतकी पसरली आहे की भक्त-भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. विशेषतः भाविकभक्त सुद्धा गणपती विसर्जनानंतर निर्माल्य, कचरा तळ्यात टाकतात. काही बेजबाबदार नागरिक तर मंदिरासमोर मेलेली जनावरे टाकण्यापर्यंत मजल गेलेली पाहून ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. पावसाचे पाणी तळ्यात मिसळल्याने परिस्थिती आणखीन गंभीर बनली आहे. कचर्यात मिसळणार्या केमिकलमुळे वन्यजीवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तळ्याभोवती असलेल्या झाडांची वाढ खुंटत असून निसर्गाचा श्वास घोटला जात आहे अशी हाक स्थानिक कार्यकर्ते देत आहेत. वनविभाग व प्रशासन डोळेझाक करत आहे, आम्ही किती दिवस या घाणीचा वास सहन करायचा? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तातडीने स्वच्छता मोहीम राबवून तळे व परिसर स्वच्छ न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.