जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीतील मतदान प्रक्रिया मंगळवारी (दि.२) पार पडली असून १५ हजार ८०० पैकी १२ हजार ३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ७८ टक्के मतदान झाले असून तीन नगराध्यक्ष पदांसह १० प्रभागांतील ५० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रविवारी (दि.२१) डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकाल हाती येणार असल्याने नागरिकांसह निवडणुकीतील उमेदवारांची उत्कंठा वाढली आहे. दरम्यान, जेजुरी पोलीस स्टेशन लगत असलेल्या मल्हार नाट्यगृहात मतदान यंत्र -ईव्हीएम मशिन्स ठेवण्यासाठी स्ट्रॉंगरूम तयार करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अंतर्गत भागात सुद्धा सीसीटीव्ही बसविले आहेत. तीन शिप्टमध्ये राज्य राखीव बल गट क्र१ (निमलष्करी दल) चे १ अधिकारी यांसह ६ जवान आतील बाजूस, तर बाहेरील बाजूस १ पोलीस उपनिरीक्षक यांसह ४ जवान पोलीस अंमलदार आदी ५४ जणांची तुकडी २४ तास कडेकोट बंदोबस्त ठेवत आहे. परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. निवडणुकीतील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी -निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांची परवानगी घेऊन परिसरात पाहणी करू शकतात, अशी माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली. सर्व यंत्रणेशिवाय राजपत्रीत अधिकारी सुद्धा नियुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. ईव्हीएमची काटेकोर अंमलबजावणी करा दरम्यान , मंगळवारी (दि.९) जेजुरी नगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशीनचा सुरक्षिततेबाबत जेजुरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश लेंडे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, शिवराज झगडे, विलास कड, सुरेश उबाळे यांच्या वतीने जेजुरी मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जेजुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिले असून मागील काळात पुरंदर तहसील आवारातून ईव्हीएम मशिन्स चोरीला गेल्याची तसेच या घटनेला जबाबदार धरत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घटना पाहता जेजुरीतील ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे पत्रामध्ये नमूद केले आहे.