nagar | उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितचे तंतोतंत पालन

टाकळी खातगाव, (वार्ताहर)- हिवरेबाजारचा आदर्श जपण्यासाठी गावकऱ्यांनी तयार केलेल्या आचारसंहितेचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी तंतोतंत पालन केल्याबदल हिवरेबाजारकरांनी उमेदवारांप्रती ॠण व्यक्त केले आहे १६ व्या लोकसभा निवडणूकीसाठी १३ मे रोजी मतदान झाले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातील सर्व उमेदवारांना गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छाही देण्यात आल्या.
आदर्श निर्माण केलेल्या हिवरेबाजारमध्ये राजकारणातून कटूता निर्माण होऊ नये म्हणून निवडणुकीच्या मतदानासाठी पोलींग एजंट, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहने याची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येते. कोणत्याही मतदारास ठराविक मतदारास मतदान करण्याची सक्ती करण्यात येत नाही.
मतदार त्याच्या मर्जीप्रमाणे मतदान करतो. त्यामुळे गावामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडते. गेल्या अनेक वर्षांपासून ही आचारसंहीता गावकऱ्यांकडून पाळण्यात येत असून उमेदवारही तीचे तंतोतंत अनुकरण करतात.
निवडणूक कर्मचारी भयमुक्त असतात निवडणूक प्रचारादरम्यान गावाने केलेल्या आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून हिवरेबाजारच्या विकासाला सर्वच उमेदवारांनी सहकार्य केले असल्याची गावकऱ्यांची भावना आहे.
एकीकडे निवडणुकीच्या राजकारणामुळे संघर्ष वाढत असताना दुसरीकडे गाव एक.ित्रत ठेवण्यासाठी अशा उपक्रमांना सर्व उमेदवारांनी दिलेल्या सकारात्मक प्रोत्साहनामुळे हिवरेबाजारकरांना नक्कीच पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम मार्गदर्शक
कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि ३५ वर्षानंतर झालेल्या हिवरेबाजारच्या ग्रामपंचायत निवडणुकीत याचे तंतोतंत पालन केले आहे. हिवरेबाजारचे ग्रामविकास, जलसंधारण, स्वच्छता, वनसंवर्धन व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच इतरांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे ग्रामपरिसर विकास समिती व ग्रामस्थाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.





