आरक्षणाचा धसका, दिवाळीचा खर्च थांबला! महापालिका निवडणुकीतील इच्छुकांनी आरक्षण सोडतीकडे लावले डोळे

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिका निवडणुकीची प्रभागरचना अंतिम झाली असली तरी प्रभागातील आरक्षण तसेच महिला आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले नसल्याने इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेषतः प्रभागातील महिला आरक्षणाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर अनेक इच्छुकांचा पत्ता कटणार आहे. यामुळे दिवाळीपुर्वी आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यास लाखो रुपये खर्च करून मतदारराजासोबत दिवाळी साजरी करायची की नाही, या द्विधा मनःस्थितीमुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
प्रभागरचना जाहीर होताच सोशल मीडियावर आणि बॅनरबाजी करून अनेक इच्छुकांनी आपली दावेदारी जाहीर केली आहे. मतदारांकडूनही दिवाळीसाठी उमेदवारांकडे तगादा लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपली संपर्क कार्यालये काही दिवसांसाठी बंद ठेवली आहेत. प्रभागरचना ४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर १० ऑक्टोबरपर्यंत सोडत काढली जाईल, असे संकेत होते. मात्र, आता १५ ऑक्टोबर रोजी सोडत काढली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
आरक्षणाचा धसका..
महापालिका निवडणुका चार सदस्यांच्या प्रभागात होणार आहेत. ४१ प्रभागांमध्ये १६५ जागांसाठी ही निवडणूक होणार असून चार सदस्यांचे चार प्रभाग तर पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर उमेदवार निश्चित होण्यासाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. एकूण सदस्यांपैकी २४ जागा अनुसूचित जाती व जमातींसाठी असतील, तर उर्वरित जागांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण असेल. त्यामुळे आपल्या प्रभागात कोणते आरक्षण पडते, यावर अनेकांची उमेदवारी ठरणार आहे. अनेक माजी नगरसेवकांच्या प्रभागातही आरक्षण पडल्यास त्यांचाही पत्ता कट होऊ शकतो.
आता दिवाळीचा सण जवळ आल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना ही नामी संधी आहे. त्यासाठी अनेकांकडून सरंजाम वाटप, दिवाळी पहाट, दिवाळी किट वाटप, फराळ वाटप असे कार्यक्रम प्रस्तावित केले आहेत. मात्र, दिवाळीसाठी खर्च करून आरक्षणामुळे तिकीट अडचणीत आल्यास तो खर्च वाया जाण्याची भीती असल्याने इच्छुकांनी आरक्षण सोडतीला धसका घेतला आहे.ही सोडत दिवाळीपूर्वी निघाल्यास खर्च वाचणार असल्याने सोमवारी शहरातील जवळपास दीडशे ते दोनशे इच्छुकांनी महापालिकेच्या निवडणूक विभागात संपर्क साधून सोडतीची तारीख विचारली जात आहे.





