पुणे जिल्हा | मतदान करून लोकशाही बळकट करा

नारायणगाव, (वार्ताहर) – विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील अशिक्षित, सुशिक्षित, महिला व तरुणांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी आपण आपले मतदान केले पाहिजे. मतदान करताना आपणांस ज्या उमेदवाराला व चिन्हाला मतदान करायचे तो प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे.
परंतु मतदान करून लोकशाही बळकटीला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन जुन्नर तालुका स्विप नोडल अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी व मनुष्यबळ पथक 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या अनिता शिंदे यांनी जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील उच्छिल, आंबोली आणि परिसरातील मतदारांना केले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले असून प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा विकासासाठी चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे.
यासाठी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मतदारांनी जागृक राहून मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीत मतदाराने मतदान करावे यासाठी तालुकास्तरीय शिक्षक पथकांच्या वतीने आदिवासी भागात मतदान जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
उच्छिल शाळेचे पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे, तालुक्यातील आदिवासी भागातील मतदारांना शेतात, वाड्या- वस्त्यांवर, घरा- घरात शेतीची कामे चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन मतदारांना जागृत करीत आहे.
मतदार जनजागृती उपक्रमाला पश्चिम भागातून मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत असून मतदार आम्ही मतदान करणार असल्याचे आश्वासन देत आहे. विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन देत आहे.





