चाकण : चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील पूल परिसरात रविवारी (दि. 16 मार्च) मध्यरात्री भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर असल्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात संबंधित महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाकण नगरपरिषदेने तात्काळ दखल घेत आंबेठाण पूल व मार्केट यार्ड परिसरातील हल्ला करणारी भटकी कुत्री जलद कृतीदलाच्या माध्यमातून पकडली. पकडलेल्या कुत्र्यांना नगरपरिषदेच्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. नगरपरिषदेकडून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत 214 कुत्र्यांवर प्रक्रिया करण्यात आली असून जानेवारी 2026 पासून आतापर्यंत आणखी 304 कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सध्या -इउ केंद्रात 35 कुत्र्यांवर प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले. हेही वाचा : मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 4 जानेवारी 2026 रोजी 36 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती, त्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतरही कोणतीही प्रभावी पावले उचलली गेली नसल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांचे टोळके रात्रीच्या वेळी नागरिकांवर धावून येत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या होत्या. कचर्याचे ढीग, उघडी मैदाने आणि अन्नाचा सहज उपलब्ध स्रोत यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. नागरिकांच्या प्रमुख तक्रारी : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत नियोजनाचा अभाव निर्बीजीकरण व लसीकरण मोहिमेचा अपुरा वेग नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा अभाव धोकादायक ठिकाणांची ओळख करून प्रतिबंधात्मक उपाययोजना नाहीत मृत महिलेल्या कुटुंबीयांना मदत द्या या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी जबाबदार अधिकार्यांवर तात्काळ कारवाई, निलंबन तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे चाकण शहरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून प्रशासनाने तातडीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. हेही वाचा :