Pimpri News: भटक्या जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट!
Pimpri News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १० ते १२ गायींचा मुक्त वावर; अपघाताचा धोका वाढला

पिंपरी – शहरात एकीकडे पावसाचा जोर वाढलेला असताना दुसरीकडे रस्त्यांवरील भटक्या जनावरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्त्यावर भर पावसात सुमारे १० ते १२ गायी मोकाट फिरताना दिसून येत आहेत. पावसामुळे रस्ते निसरडे झालेले असतानाच गायींचा कळप थेट रस्त्यावर वावरत असल्याने वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे.
या परिसरात बसस्टॉप, मोठे हॉस्पिटल तसेच विविध छोटे मोठे उद्योग असल्याने दिवसभर नागरिक, कर्मचारी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर गायी अचानक वाहनांसमोर येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः भर पावसात दृश्यता कमी असताना आणि रस्ता ओला असताना वाहनचालकांना जनावरांपासून बचाव करणे अधिक कठीण होत आहे. भटक्या जनावरांचा हा प्रश्न शहरासाठी नवीन नाही. यापूर्वीही विविध भागांतील प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर आढळून आला आहे.
कारवाईनंतर काही काळ परिस्थिती नियंत्रणात येते; मात्र पुन्हा जनावरे रस्त्यावर दिसू लागल्याने प्रशासनाच्या कारवाईच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.महापालिका प्रशासनाने भर पावसात रस्त्यावर वावरणाऱ्या भटक्या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून नियमितपणे पकड मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्याआधीच प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
हेही वाचा :
Gautam Adani : गौतम अदानींना अमेरिकन न्यायालयाचा मोठा दिलासा; फसवणूक आणि लाचखोरीचे फौजदारी आरोप रद्द





