Pune Accidennt News : चांदणी चौकात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

Pune Accidennt News : पुणे शहरातील चांदणी चौकात एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांची वाहतूक करणाऱ्या कंटनेराचा अपघात झाला असून, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर चांदणी चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, व्हिडिओत बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सळ्या घेऊन कंटनेर जात असल्याचे दिसत आहे. हा कंटेनर चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. यावेळी अचानक ब्रेक दाबल्याने यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हर आणि एक सहकारी केबिनमध्ये अडकून पडले होते.
यावेळी रस्त्यावरून येणारे अनेकजण घटनास्थळी थांबले आणि यातील तरुणांनी ड्रायव्हरला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खूपच अवघड काम असल्याचे तेथील परिस्थितीवरून दिसत आहे. या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमल दलाला मिळाल्यानंतर युद्धपातळीवर अडकलेल्यांना सोडवण्याचे काम सुरू करण्यात आले. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांची वाहतूक किती धोकादायक असते याचे उदाहरण म्हणजे हा कंटनेटर अपघात आहे.
हेही वाचा: ट्रॅफिकमध्ये अडकली अन् जीव वाचला; थरारक अनुभव सांगत महिला म्हणाली, “गणपती बाप्पामुळे वाचले…”





