पुणे | वक्फ विधेयकावरून नागरिकांची दिशाभूल थांबवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वक्फ बोर्डाच्या जागांचा बेकायदेशीर व गैरवापर बंद व्हावा, यासाठीच विधेयक मांडले आहे. मात्र, याद्वारे सरकार मुस्लिमांच्या जमिनी काढून घेणार आहे, असा अपप्रचार काही व्यक्ती करत आहेत.
हा अपप्रचार तातडीने थांबवावा आणि या विधेयकावरुन नागरिकांची दिशाभूल करू नये, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर रिजीजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वक्फ कायद्यात बदल व्हावा, जागांचा योग्य वापर व्हावा, यासाठी या कायद्यातील सुधारणांना मुस्लीम समाजातील अनेक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. त्यावर नागरिकांनी सव्वा कोटींहून अधिक हरकती-सूचना पाठवल्या आहेत.
हा एक जागतिक विक्रम आहे. इतक्या हरकती सूचना येतील, असा विचारही कोणी केला नव्हता. यातील सर्व हरकती सूचनांची दखल घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारची कामगिरी, राज्यातील महायुती सरकारची कामगिरी पाहून महाराष्ट्राची जनता महायुतीलाच पाठिंबा देईल. राज्यात जातीपातीवरून विभाजन करण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचे किरेन रीजिजू यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरही टीका
आतिशी मार्लेना या दिल्लीच्या रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री असतील. केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची कर्तव्य बजावता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी ठेवली तर त्याला काहीही अर्थ नाही, याकडे रीजिजू यांनी लक्ष वेधले.





