पुण्यात 20 कोटींच्या खंडणीसाठी शेअर दलालाचे अपहरण

पुणे, दि. 9 -कोथरुड येथील गजानन उर्फ गजा मारणे टोळीने 20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शेअर दलालाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी टोळीतील चौघांना अटक करण्यात आली.
सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. धनकवडी), अमर शिवाजी किर्दत, फिरोज महंमद शेख (दोघे रा. कोडोवली, जि. सातारा) आणि हेमंत बालाजी पाटील (रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर गजानन उर्फ पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णराव मारणे (दोघे रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरुड) तसेच एका महिलेसह तीन ते चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेअर दलालाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदाराचा शेअर बाजारात गुंतवणूक तसेच जमीन खरेदी विक्री व्यवसाय आहेत. तक्रारदार आणि त्याचा मित्र 7 ऑक्टोबर रोजी कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी मारणे टोळीतील सराइतांनी त्याला धमकावून मोटारीत बसवले. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी नेले. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे 20 कोटींची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास तक्रारदार तसेच त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मारणे टोळीने खंडणीसाठी शेअर दलालाचे अपहरण केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांनी तातडीने तपास करून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांची पथकाने अपहरण करण्यात आलेल्या शेअर दलालाची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. मारणे टोळीतील चौघांना अटक करण्यात आले. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, शैलजा जानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अविनाश लाहोटे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे यांनी ही कारवाई केली.
गजा मारणेचा शोध सुरू
गुन्हेगारी वर्तुळात “महाराज’ या टोपण नावाने गजा मारणे ओळखला जात असून मारणेची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून कोथरुडपर्यंत फेरी काढण्यात आली. द्रुतगती मार्गावर 300 ते 400 मोटारींच्या ताफ्यातून मारणे पुण्यात आला होता. समाजमाध्यमावर ध्वनीचित्रफित प्रसारित करुन दहशत पसरवण्यात आली होती. या प्रकरणात मारणेसह 300 ते 400 जणांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, या अपहरण घटनेनंतर गजा मारणे फरार असल्याचे समोर आले आहे.





