Stock market : RBIच्या ‘त्या’ घोषणेनंतर शेअर बाजारात ‘नफावसुली’; सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक घसरले
Stock market : मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 116.67 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 74,243.34 अंकांवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने 74,717.57 या उच्चांकी आणि 73,988.75 या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

Stock market : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात नफावसुलीचे व्यवहार वाढले. जीडीपी वाढीचा अंदाज कमी करणे आणि महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी, शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद झाले. (Stock market )
मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 116.67 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 74,243.34 अंकांवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने 74,717.57 या उच्चांकी आणि 73,988.75 या नीचांकी पातळीला स्पर्श केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 49.85 अंकांनी (0.21 टक्के) घसरून 23,366.70 अंकांवर बंद झाला.
रेपो दर कायम – (Stock market )
RBI च्या पतधोरण समितीने (MPC) एकमताने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘न्यूट्रल’ धोरणात्मक भूमिका कायम राखली. वाढत्या भू-राजकीय तणाव, ऊर्जा किमतींतील वाढ आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी आणि रुपयाला पाठबळ देण्यासाठी RBI आणि केंद्र सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या.
हेही वाचा – ‘या’ कारणामुळे रेपो दर जैसे थे; महागाईबाबत मोठी चिंता
या उपाययोजनांमुळे रुपयाला आधाराची अपेक्षा – (Stock market )
यामध्ये सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पात्र विदेशी गुंतवणूकदारांसाठी व्याज उत्पन्न व भांडवली नफ्यावरील कर रद्द करणे, अनिवासी भारतीयांच्या परकीय चलन ठेवींना सवलती देणे तसेच काही विदेशी कर्जांसाठी हेजिंग खर्चावर अनुदान देण्याचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे रुपयाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोणते शेअर्स वाढले-घटले –
सेन्सेक्समधील समभागांमध्ये ट्रेंट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), टाटा स्टील, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स आणि बजाज फायनान्स यांनी वाढ नोंदवली. (Stock market)
RBI ने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज 6.9 टक्के होता. तसेच आगामी आर्थिक वर्षात महागाई दर 5.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तिसऱ्या तिमाहीत तो 5.9 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असे RBI ने म्हटले आहे.
तज्ज्ञांचे मत – (Stock market)
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “RBI चा निर्णय अपेक्षेनुसार असला आणि रुपयाला बळकटी देणाऱ्या उपाययोजना जाहीर झाल्या असल्या, तरी आर्थिक वाढीच्या अंदाजातील कपात आणि महागाईबाबतचा सावध दृष्टिकोन यामुळे गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.”
दरम्यान, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 4,447.06 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. पश्चिम आशियातील वाढता तणाव, परकीय निधीची माघार आणि आशियाई बाजारातील कमकुवत वातावरण यांचाही भारतीय बाजारावर परिणाम झाला.
जागतिक बाजाराची स्थिती –
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक तब्बल 5.5 टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. याउलट युरोपीय बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले.
जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूडचा दर 0.11 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 94.93 डॉलरवर आला. गुरुवारी सेन्सेक्स 13.84 अंकांनी तर निफ्टी 10.95 अंकांनी वाढून बंद झाला होता. मात्र शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे बाजाराने पुन्हा घसरण नोंदवली.






