मुंबई – सध्या रिझर्व्ह बँकेचे रेपो दर केवळ सव्वा पाच टक्क्यांवर आहे. त्यामुळे ग्राहक आनंदी आहेत. ही परिस्थिती प्रदीर्घ काळ कायम राहण्याची शक्यता रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्लोत्रा यांनी व्यक्त केली. महागाई कमी असण्याबरोबरच अर्थव्यवस्था बळकट आहे. त्याचबरोबर लवकरच भारताचा युरोप आणि अमेरिकेबरोबर व्यापार करार होण्याची शक्यता असल्यामुळे प्रदीर्घ काळ व्याजदरात वाढ करण्याची गरज पडणार नाही असे त्यांनी सूचत केले. जर व्याजदर कमी पातळीवर राहिले तर नागरिकांना आणि उद्योगांना या भांडवलाचा वापर करता येणार असल्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारण्याबरोबरच राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ होत राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपासून रिझर्व बँकेने व्याजदरात तब्बल 1.25% कपात केली आहे. सध्या व्याजदर केवळ 5.25% आहे. काही विश्लेषकांना आणखी एक 0.25 टक्के कपातीची शक्यता वाटते. तसे झाले तर रिझर्व बँकेचा रेपो दर पाच टक्के इतका होणार आहे. जर दरम्यानच्या काळात युरोप आणि अमेरिकेबरोबर व्यापार करार झाला तर परिस्थिती आणखी सकारात्मक होईल. भारताच्या माहिती संकलनाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले असतात मल्होत्रा यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणातील माहिती संकलनात काही प्रमाणात तुट राहू शकते. ही तूट सुधारित आकडेवारीमध्ये वेळोवेळी भरून निघत असते. शिवाय संदर्भवर्ष जुने असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केल्या आहेत. आता संदर्भवर्ष बदलले जाणार असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.