शेअर बाजार निर्देशांक वाढले 1.5 टक्क्याने; देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढल्याचा परिणाम

मुंबई – भारताचे स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. शेअर बाजार निर्देशांकाचे करेक्शन संपुष्टात आले आहे, अशी भावना स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कालपासून खरेदी वाढली आहे. मंगळवारीही जोरदार खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक दीड टक्क्याने वाढ वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,131 अंकांनी वाढून 75,301 बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 325 अंकांनी म्हणजे 1.45 टक्क्यांनी वाढून 22,834 अंकांवर बंद झाला.
झोमॅटो, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा, टाटा मोटर्स, लार्सन अँड ट्युब्रो, एशियन पेंट्स, टायटन, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. बजाज फिन्सर्व, एअरटेल, टेक महिंद्रा, रिलायन्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यामुळे खरेदी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 4,488 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावादी असलेल्या देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 6,000 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यावरून देशातील गुंतवणूकदारांकडून खरेदी होत असल्यामुळे निर्देशांक वाढत असल्याचे दिसून येते.
परदेशातून सकारात्मक संदेश
अमेरिकेतील महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर कपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर तेथील ग्राहकांकडून खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. चीन देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून खरेदी व्हावी याकरिता सवलती जाहीर करणार आहे. त्यामुळे चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवर झाला.
डॉलर कमकुवत
अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यानंतर त्याचा परिणाम अमेरिकेवरच होण्याची शक्यता जास्त वाढली आहे. अशा परिस्थितीत या अगोदर वधारत असलेला डॉलर इंडेक्स वेगाने कमी होत असून आता डॉलर इंडेक्स 103.32 अंकावर आला आहे. यामुळे रुपयांसह इतर जागतिक चलनांना आधार मिळत आहे. भारताच्या दृष्टिकोनातून ही सकारात्मक बाब असल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. लवकरच परदेशी गुंतवणूकदारही भारतीय शेअर बाजारात खरेदी करतील. सध्या डॉलर बळकट असल्यामुळे आणि रुपया कमकुवत असल्यामुळे हे गुंतवणूकदार विक्री करीत आहेत.
करेक्शन समाप्त झाल्याची भावना
तांत्रिक विश्लेषणानुसार आता भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्याच्या पातळीपेक्षा कमी होणार नाहीत. त्यामुळे सध्या भारतीय कंपन्यांचे स्वस्त झालेले शेअर विकत घेण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यातच तिसर्या तिमाहित विकासदर 6.2% वर गेला आहे. औद्योगिक उत्पादन वाढून 5.1% वर गेले आहे. तर प्रत्यक्ष कर संकलन 16 टक्क्यांनी वाढले आहे. परकीय व्यापारातील तूट कमी झाली आहे. किरकोळ महागाई 3.6 टक्के या कमी पातळीवर आहे. सध्या खरेदी फायदेशीर ठरेल असेल देशांतर्गत गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत आहे.
तरीही गुंतवणूकदार सावध
रशिया- युक्रेन युद्ध समाप्त करण्याबाबत अमेरिकेच्या पुढाकाराने मध्य पूर्वेत चर्चेची एक फेरी झाली आहे. त्याचबरोबर या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी युद्धबंदी संदर्भात चर्चा करणार आहेत. याबाबत बरेच लोक आशावादी आहेत. गुंतवणूकदारांचे या चर्चेकडे लक्ष लागणार आहे. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे.
000000
रुपयाच्या मूल्यात 26 पैशांची वाढ
मुंबई – शेअर बाजाराबरोबरच चलन बाजारातील अस्थिरता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यापार युद्धाच्या सुरुवातीला बळकट झालेला डॉलर आता कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत इतर आशियाई चलनासह रुपयांच्या मूल्यात वेगाने वाढ होत आहे. मंगळवारी रुपयाचा भाव 26 पैशांनी वाढून 86 रुपये 55 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला.
सोमवारी रुपयाचा भाव 24 पैशांनी तर गेल्या गुरुवारी 17 पैशांनी वाढला होता. कामकाजाच्या सलग तीन दिवसांत रुपयाच्या मूल्यात 67 पैशांची वाढ झाली आहे. यामुळे आता रिझर्व बँकेला रुपयांचे मूल्य स्थिर करण्यासाठी डॉलर खर्च करावे लागणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
डॉलर कमकुवत होत असला तरी येमेनच्या आखातातील संघर्षामुळे खनिज तेलाचे दर गेल्या दोन दिवसांपासून वाढत आहेत. सध्या खनिज तेलाचा दर 72 डॉलरवर गेला आहे. यामुळे रुपया बळकट होण्यास मर्यादा येत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री कमी केली असली तरी ती अजून थांबविलेले नाही. हा रुपयाच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी 4,488 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. यामुळे भारतातील परकीय चलन साठ्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि रुपयाच्या मूल्यावर दबाव येतो.
इतर सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या वेगाने कमी होत आहे. मंगळवारी हा इंडेक्स 0.04 टक्क्यांनी कमी होऊन 103.32 अंकावर गेला. एक महिन्यापूर्वी हा इंडेक्स 110 अंकाच्या पुढे गेला होता. त्यावेळी रुपयाच्या मूल्यात वेगाने घट होत होती. दरम्यान बुधवारी अमेरिकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याकडे चलन बाजारातील व्यापार्यांचे लक्ष आहे. अमेरिकेने व्याजदर कपात केली तर रुपयाला आधार मिळू शकतो, असे समजले जातात आहे.
0000000
बहुतांश गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करतात; भारतीय गुंतवणूकदारांबाबत आशिष कुमार चौहान यांचे मत
नवी दिल्ली – भारतातील बहुतांश गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करतात. एकूण 11 कोटी गुंतवणूकदारांपैकी केवळ दोन टक्के गुंतवणूकदार डेरिव्हेटिव्हज सारख्या अनिश्चित क्षेत्रात कार्यरत असतात असे मत राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केले आहे.
सिंगापूर येथे या विषयावरील परिसंवाद बोलताना ते म्हणाले की, भारतीय गुंतवणूकदार आता शिस्तबद्ध आणि कमी जोखीम घेण्याच्या पद्धतीने गुंतवणूक करीत आहेत. सध्याची शेअर बाजारातील अस्थिरता भारताच्या किंवा इतर देशांच्या कमकुवत अर्थव्यवस्थापेक्षा विविध देशांदरम्यान चालू असलेल्या राजकीय वादातून निर्माण झालेली आहे. सध्या विविध देशांदरम्यान विविध विषयावरून मतभेद आणि संघर्ष चालू आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर इतर विषयांपेक्षा जास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपण या बाबी टाळू शकत नाही आणि त्याकडे लक्ष देऊन काम करावे लागत लागणार आहे.
ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्लॅटफॉर्म इत्यादी सारख्या कार्यक्षम आधुनिक तंत्रज्ञानामुळे आगामी काळात भांडवली बाजाराचे रूप अमुलाग्र बदलणार आहे. त्याचबरोबर सायबर हल्ल्यासारखे धोके वाढणार आहेत.
तूर्त डॉलर जागतिक चलन
जागतिक चलनाच्या भविष्याबाबत त्यांनी सांगितले की, सध्या तरी अमेरिकेचा डॉलर जागतिक चलन म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे. दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने जागतिक व्यापाराचे चलन डॉलर राहावे यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले होते. त्यामुळे सध्या तरी जागतिक व्यापारात डॉलरचा वापर कायम राहणार आहे. अनेक देश किंवा देशांचे समूह डॉलरला आव्हान देत होते आणि देत राहणार आहेत. मात्र सध्यातरी जागतिक व्यापारात आणि गुंतवणुकीत डॉलर आपले मजबूत स्थान कायम ठेवून आहे, असे ते म्हणाले.





