Stock Market: …तरीही निर्देशांक 10 टक्क्यांनी वाढतील

Stock Market – देशातील आणि परदेशातील नकारात्मक घटनाक्रमामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या कमी पातळीवर . मात्र 2025 या वर्षात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक किमान दहा टक्क्यांनी वाढतील, असे सिटी ग्रुप या संस्थेने भाकीत केले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 2025 मध्ये 26,000 अंकावर जाईल. नऊ वर्षापासून भारतीय शेअर बाजारानी सकारात्मक परतावा दिला असून दहाव्या वर्षात यात खंड पडणार नाही असे या संस्थेला वाटते.
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवीत होत आहे. त्याचबरोबर कंपन्यांचे ताळेबंद नफादायक राहणार आहेत. अशा परिस्थितीत रिटेल गुंतवणूकदार जास्त गुंतवणूक करतील. पाच लाख कोटी डॉलरचा भारतीय शेअर बाजार आणखी वाढेल असे या संस्थेचे म्हणणे आहे.
2024 मध्ये निफ्टी 22,500 पर्यंत वाढेल असे भाकीत या संस्थेने केले होते. मात्र निफ्टी त्यापेक्षा जास्त पाच टक्क्यांनी वाढला आहे. सध्या नकारात्मक वातावरण असले तरी यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करेल. विकासदर 6.5% पेक्षा जास्त राहील. याचे सकारात्मक प्रतिबिंब शेअर बाजारात पडेल.
या अगोदर मॉर्गन स्टॅन्ली या संस्थेने 2025 मध्ये निर्देशांक 18 टक्क्यांनी वाढतील असे म्हटले होते. शेअरच्या पुरवठ्यापेक्षा खरेदीची क्षमता जास्त आहे असे या संस्थेचे म्हणणे आहे. 2024 मध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी 1.5 लाख कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. या वर्षात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी एकतर्फे खरेदी न करता वातावरण अस्थिर ठेवले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून रिटेल गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवून शेअरची खरेदी चालूच ठेवली आहे.
आगामी काळातही परदेशी गुंतवणूक मर्यादित झाली तरी गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करून शेअर बाजारात खरेदी करीत राहण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. विकासदर साडेसहा टक्के होणार असला तरी तो इतर देशापेक्षा जास्तच आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे सांगण्यात आले.




