Stock Market: स्थानिक गुंतवणूकदाराकडून खरेदी वाढली; शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ

मुंबई – देशातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदी वाढविल्याचे दिसून येत आहे. सोमवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आले. या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 341 अंकांनी वाढून 74,169 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 111 अंकांनी म्हणजे 0.50 टक्क्यांनी वाढून 22,508 अंकांवर बंद झाला.
बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, झोमॅटो, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आयटीसी, नेस्ले, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
इंडसइंड बँकेच्या शेअरचा भाव आज साडेपाच टक्क्यांनी वाढला. या बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केल्यानंतर या शेअरच्या भावात वाढ झाली. गेल्या आठवड्यात या बँकेच्या शेअरचा भाव 27 टक्क्यांनी कोसळला होता.
आशियाई शेअर बाजारातील निर्देशांक वाढले होते. तसेच युरोपियन आणि अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात बरीच खरेदी झाली. मेहता इक्विटीच्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आता कमी होणार नाहीत असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र तरीही गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाई वाढवून 2.38% इतकी झाली. खाद्यतेल आणि प्रक्रियायुक्त पदार्थाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून गुरुवारी 792 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री झाली. या गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये आतापर्यंत 1.42 लाख कोटी रुपयाच्या म्हणजे 16.5 अब्ज डॉलरच्या शेअरची विक्री केली आहे.
ओला इलेक्ट्रिकचा शेअर कोसळला –
ओला इलेक्ट्रिक कंपनीची उपकंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज या कंपनी विरोधात रोजमेर्टा डिजिटल सर्विसेस या कंपनीने पेमेंट न मिळाल्याबद्दल तक्रार दाखल केल्यामुळे ओला इलेक्ट्रिक या कंपनीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी कमी होऊन निचांंकी पातळीवर गेला. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य विकास दिवसात 1,601 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्विस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या रोजमेर्टा डिजिटल सर्विसेसने ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज कंपनी विरोधात दिवाळखरी संहितेअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ओला इलेक्ट्रिक कंपनीने शेअर बाजारांना माहिती कळविली आहे.
बंगळुरू येथील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरनात सादर केलेल्या याचिकेत रोजमेर्टा कंपनीने म्हटले आहे की, आमचे पेमेंट ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज कंपनीकडून आलेले नाही. त्यामुळे आम्ही या कायद्याच्या आधारावर याचिका दाखल करीत आहोत. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने स्पष्ट केले आहे की आम्ही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत आपली बाजू मांडणार आहोत. गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी दोन भागीदार कंपन्यासोबतच्या कामकाजाचा आढावा घेत असल्याचे सांगितले होते.




