Stock Market : ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ₹3.79 लाख कोटींचे नुकसान
Stock Market : पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली. त्याचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला असून सेन्सेक्स 307 तर निफ्टी 95 अंकांनी घसरला.

Stock Market : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढल्याने कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आयटी आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने सोमवारी (31 ऑगस्ट) बाजार घसरणीसह बंद झाला. जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळेही गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला आहे.
सेन्सेक्स 307 अंकांनी घसरला –
मुंबई शेअर बाजाराचा 30 कंपन्यांचा सेन्सेक्स 307.24 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 76,957.27 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्समध्ये एका टप्प्यावर 513.19 अंकांची घसरण झाली होती. तो 76,751.32 अंकांपर्यंत खाली आला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर 10 कंपन्यांचे शेअर्स वाढले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 95.25 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 24,080.40 अंकांवर बंद झाला.
या शेअर्सवर विक्रीचा दबाव –
सेन्सेक्समधील अदानी पोर्ट्स, ITC, भारती एअरटेल, HDFC बँक, इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक हे प्रमुख घसरणारे शेअर्स ठरले. दुसरीकडे सन फार्मा, ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
गुंतवणूकदारांचे ₹3.79 लाख कोटी बुडाले –
एका व्यवहाराच्या दिवसापूर्वी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी बीएसईवर (BSE) सूचिबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ₹4,94,12,415.27 कोटी होते. आज म्हणजेच 31 ऑगस्ट 2026 रोजी ते घसरून ₹4,90,33,359.29 कोटींवर आले. याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांच्या भांडवलात आज ₹3,79,055.98 कोटींची घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाचा दर 91 डॉलरवर –
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात जोरदार वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा दर 3.63 टक्क्यांनी वाढून 91.30 डॉलर प्रति बॅरल झाला. अमेरिकेतील आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांच्या मते, राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता कमी झाल्याने कच्चे तेल आणि जागतिक रोख्यांचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे महागाई आणि व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची चिंता निर्माण झाली असून, त्याचा कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.
जॅक्सन होलमधील भाषणानंतर फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जागतिक रोख्यांचे उत्पन्न उच्च राहिले असून, उदयोन्मुख बाजारांमध्ये अल्पकालीन अस्थिरता वाढली आहे.
जागतिक बाजारांची स्थिती –
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि शांघायचा SSE कम्पोझिट वाढीसह बंद झाले. तर जपानचा निक्केई 225 आणि हाँगकाँगचा हँग सेंग घसरणीसह बंद झाले. युरोपियन बाजारांमध्येही बहुतांश निर्देशांक घसरणीत व्यवहार करत होते. शुक्रवारी अमेरिकेचे बाजारही घसरणीसह बंद झाले.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातून 5,039.80 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, अशी एक्स्चेंजची आकडेवारी आहे.
दरम्यान, शुक्रवारी सेन्सेक्स 330.92 अंकांनी वाढून 77,264.51 अंकांवर, तर निफ्टी 84.80 अंकांनी वाढून 24,175.65 अंकांवर बंद झाला होता.






