…तरीही वार्षिक विकासदर समाधानकारक राहील; अर्थ मंत्रालयाचे सल्लागार नागेश्वरन यांचा आशावाद

नवी दिल्ली – शुक्रवारी दुसर्या तिमाईचा विकासदर कोसळून दोन 2 वर्षाच्या निचांकावर म्हणजे 5.4 टक्क्यावर गेला आहे. अशा परिस्थितीत वार्षिक विकास दर बराच कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी सांगितले की एकूण परिस्थिती पाहता या वर्षाचा विकासदर किमान 6.5% होण्यात कसल्याही अडचणी येणार नाहीत.
गेल्या वर्षाचा विकास दर 8.2% होता. मात्र जागतिक आणि देशातील नकारात्मक परिस्थितीमुळे या वर्षाचा विकासदर 6.5 ते 7% राहील असे अर्थसंकल्पावेळी सादर करण्यात आलेल्या अर्थ आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते. दुसर्या तिमाहीचा विकासदर अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे. हे खरे आहे. मात्र आगामी काळात परिस्थिती सुधारण्याची स्पष्ट लक्षणे दिसून येत आहेत. ते म्हणाले की. चांगल्या पावसामुळे खरिपाचे विक्रमी उत्पादन होणार आहे. रब्बीचे उत्पादन वाढणार आहे.
त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेला या संकटाच्या वेळी मदत करू शकेल. बांधकाम क्षेत्राचा विकासदर चांगला आहे. या क्षेत्रातील उमेद कायम आहे. हे क्षेत्र हे विकासदराला आधार देऊ शकेल. ते म्हणाले की, मागील आकडेवारी पाहिली तर दरवर्षी दुसर्या तिमाहीत विकासदर मंदावत असतो. मात्र त्यानंतर सर्व क्षेत्राची उत्पादकता वाढत असते आणि एकूण वर्षाचा विकासदर वाढण्यास मदत होत असते.
अर्थव्यवस्थेसमोरील अडथळ्याबाबत त्यांनी सांगितले की, जगात युद्ध चालू आहेत. त्याबरोबरच जागतिक पातळीवर महागाई आहे. त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झालेला आहे. याचा परिणाम भारताच्या व्यापारावरही होत आहे. देशातील महागाई पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे वाढली आहे. तर भांडवल सुलभता कमी आहे. या प्रश्नावर आपल्याला विचार करावा लागणार आहे.





