राज्याला चीनकडून सायबर हल्लाच्या धोका

मुंबई – भारत-चीनमध्ये झालेल्या सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून राज्यात सायबर हल्ला होण्याचा धोका आहे. यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असे सायबर सेलकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात चार ते पाच दिवसांत 40 हजार 300 वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. चीनच्या चेंगदू भागातून सायबर अटॅकचे प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे प्रयत्न करणारे इन्फ्रास्ट्रक्चर, बॅंकिंग सारख्या विभागांना टार्गेट करत आहेत, अशी माहिती सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली. तसेच राज्यातील नागरिकांना कुठलाही अनोळखी ईमेल, अटॅचमेंट उघडू नये, असा सल्ला दिला आहे. याशिवाय आपली वैयक्तिक आणि बॅंक संबंधित माहिती कुणाहीसोबत शेअर करु नये, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.
सध्याच्या काळात भारत-चीन सीमावाद पाहता, चिनी हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स [email protected] या ईमेल आयडीच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्ल्यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे.
हॅकर्सकडून सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला ईमेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit, त्या इमेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल [email protected] / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी ईमेलवरुन पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.





