V Shantaram Award : राज्य सरकारचे मानाचे पुरस्कार जाहीर.! हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार; राणी मुखर्जी, प्रसाद ओक यांचाही सन्मान!
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

V Shantaram Award : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये संगीतविश्वातील दिग्गज पं. हृदयनाथ मंगेशकर, मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, हिंदी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा सन्मान होणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य सरकारने हा मानाचा बहुमान जाहीर केला आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार :
यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या संगीताचा ठसा आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. भावगीत, भक्तीगीत, शास्त्रीय संगीतावर आधारित रचना आणि चित्रपट संगीताच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रसाद ओक यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार :
मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक यांची व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. विशेषतः ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनामुळे त्यांची देशभरात मोठी चर्चा झाली होती.
सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार :
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना यंदाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पटकथालेखक जावेद अख्तर यांच्यासोबत ‘सलीम-जावेद’ या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर चित्रपट दिले. ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या कथा आणि पटकथेमुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवला.
राणी मुखर्जीला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार :
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री राणी मुखर्जी हिला राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे राणीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या आहेत. ‘ब्लॅक’, ‘हम तुम’, ‘मर्दानी’, ‘वीर-झारा’, ‘नो वन किल्ड जेसिका’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून दाद दिली. राष्ट्रीय तसेच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार तिच्या नावावर आहेत.
महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि तांत्रिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. यंदाही विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज कलाकारांची निवड करून राज्य सरकारने त्यांच्या योगदानाला मानवंदना दिली आहे.






